महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहून जाणारे पाणी करा 'रिचार्ज'; जलजीवन फाऊंडेशनचा उपक्रम - पाणी फाउंडेशन

ग्रामीण भागापेक्षा शहरात पाण्याचा अपव्यय अधिक होत असून वाहून जाणारे पाणी 'रिचार्ज' व्हावे, यासाठी अमरावतीच्या जल जीवन फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

वाहून जाणारे पाणी करा 'रिचार्ज'; जलजीवन फाऊंडेशनचा उपक्रम

By

Published : May 12, 2019, 8:51 PM IST

अमरावती- ग्रामीण भागापेक्षा शहरात पाण्याचा अपव्यय अधिक होत असून वाहून जाणारे पाणी 'रिचार्ज' व्हावे, यासाठी अमरावतीच्या जल जीवन फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्यात अमरावती शहरात शंभर ठिकाणी हा उपक्रम यशस्वी करण्याचा मानस या संस्थेचा असून त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


ग्रामीण भागात पाणी फाऊंडेशन सक्रिय असताना शहरातही वाया जाणाऱ्या १०० टक्के पाण्यापैकी ७० टक्के सांडपाणी पुन्हा जमिनीत जिरवून दिवसेंदिवस घटत जाणाऱ्या भूजल पातळीत वाढ व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. शहरात पाण्याचा उपसा मोठया प्रमाणात होत असल्याने वाहून जाणारे पाणी 'रिचार्ज' कसा करता येईल, यासाठी जल जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आशिष माशानकर यांच्यासह सेवानिवृत्त अभियंता सतीश देशमुख, रणजित जव्हेरी, डॉ. अश्विनीकुमार देशमुख, डॉ. अनुपमा देशमुख,रुपेश जव्हेरी, डॉ. नितीन दातीर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी एकत्र आली आहेत.


काय आहे रिचार्ज प्रयोग -
बेलपुरा परिसरात सतीश देशमुख यांच्या अंगणात दोनशे मीटरचा खड्डा खोदून त्यात एक ड्रम ठेवला आहे. खड्ड्यातील ड्रमला देशमुख यांच्या घरातील बाथरूम आणि बेसीन मधून वाहून जाणारे पाणी खड्ड्यातील ड्रममध्ये सोडण्यात आले. ड्रमच्या वरच्या भागाला अनेक छिद्र केल्याने ड्रम मध्ये जमा होणारे पाणी जमिनीचे झिरपायला लागले. जे पाणी नालीतून वाहून जाते ते पाणी जमिनीत झिरपायला लागल्याने भूजलपातळी वाढण्यास मदत होते. केवळ अडीच ते ३ हजार रुपयात हा प्रयोग यशस्वी होत असल्याने अमरावतीकरांनी असे शोष खड्डे करून भूगर्भात पाणी साठविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ. माशनकार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केले.


उन्हाळा संपायच्या आत अमरावती शहरात असे शंभर शोष खड्डे जरी तयार झालेत तर जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाईल. आज पाण्याची भीषण समस्या जाणवत असताना भविष्याचा विचार करून आजच असे अल्प खर्चाचे प्रयोग करून पाणीसाठा वाढविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. पाणी वाचविण्यासाठीची ही मोहीम सामाजिक चळवळ व्हायला हवी असे मत डॉ. माशानकर यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details