अमरावती - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या साठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने शनिवारी एक दिवसाचा संप पुकारला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध 26 मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली.
सातव्या वेतनासह विविध २६ मागण्यांसाठी संत गाडगेबाबा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा संप - strike
अकृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह २६ मागण्यांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने शनिवारी एक दिवसाचा संप पुकारला.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीसाठी 3 जून पासून विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले. कुलगुरू, उच्च शिक्षण सहसंचालकाना निवेदन देणे, काळ्या फिती लावून काम करणे, अशी भूमिका आजवर विद्यापीठ कर्मचारी संघटनेने घेतली. शेवटी शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शनिवारी १ दिवसाचा बंद करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन मागण्या पूर्ण करण्याबाबत घोषणा दिल्या.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली. संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या आजच्या काम बंद आंदोलनाला नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे. शासनाने विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर 15 जुलै पासून बेमुदत संपाचा इशारा देशमुख यांनी दिला.