अमरावती - गेल्या वर्षी अनाधिकृत व बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. यंदा पुन्हा बियाण्यांचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. यंदा अमरावती विभागात बोगस बियाण्याप्रकरणी कृषी विभागाच्या वतीने सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. अमरावती व यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात बियाण्यांचा काळाबाजार सुरू आहे.
यावर्षी विदर्भात मान्सून १५ जूनच्या अगोदर दाखल झाला आहे. पाऊस आल्याने बळीराजा देखील सुखावला आहे. १०० मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला देखील सुरुवात केली आहे. मात्र खरिपाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. असे बियाणे खरेदी केल्यास त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अंजन्सिंगी येथे बीटी बियाण्याचे अप्रमाणित असलेले १८९१ पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळणार नाही यासाठी कृषी विभागाने धोरण आखावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बोगस बियाण्यांचा 2 हजार शेतकऱ्यांना फटका
गेल्यावर्षी अप्रमाणित बियाणे न उगवल्याने जवळपास 2 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यंदा अमरावती विभागात अमरावती व यवतमाळमध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट दिसून येतो आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा तथा तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथक तयार केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी बियाने खरेदी करताना त्याची पक्की पावती सोबत घ्यावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.