अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी रात्री रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये वाद झाला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रुग्णालयात ३० पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यामुळे रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
धामणगाव रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा; पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात - अमरावती
अमरावतीमधील धामणगाव रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी चांगलाच राडा केला होता. पोलिसांनी त्वरीत नियंत्रण तुकड्या तैनात केल्याने वाद मिटला.
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव येथील नरेंद्र दिवाकर बाभुळकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णास अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याचा आग्रह धरला. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेसोबत वाद झाला. या घटनेची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. दरम्यान रुग्णाची स्थिती गंभीर झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी लगेच रुग्णालय परिसर ताब्यात घेतला. तातडीची उपाययोजना म्हणून पोलीस आणि दंगल नियंत्रण तुकड्याही बोलावण्यात आल्या. त्यामुळे सकाळपर्यंत ग्रामीण रुग्णालयाला छावणीचे स्वरूप आले होते. दोन्ही पक्षांनी सामंजस्य दाखवून सामोपचाराने प्रकरण मिटवले. यामध्ये चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.