अमरावती- 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल' असा जयघोष करीत रुक्मिणीचे माहेर असणाऱ्या कौडण्यापूर येथून आज रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला निघाली. आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपूरला पोहोचणार असून आज(रविवारी)सायंकाळी येथील बियाणी चौकात या पालखीचे आगमन होताच शेकडो अमरावतीकर भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. कौडण्यापूर येथून पंढरपूरला पालखी जाण्याची परंपरा ४२४ वर्षांपासून जोपासली जात आहे.
१५९४ सालापासून कौडण्यापूर येथून रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला जाते. आमदार यशोमती ठाकूर या अनेक वर्षांपासून बियाणी चौक येथे पालखीच्या स्वागताचे आयोजन करतात. आज पालखी येण्यापूर्वी बियाणी चौकात येणारी वाहतूक तासभर आधीपासून इतर मार्गाने वळविण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला भविकांसोबत आमदार यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा ताल धरला.