अमरावती - समस्त विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रसंताना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो गुरुदेव भक्त हजारो पालख्या घेऊन अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. उद्या (शनिवारी) दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने हजारो भाविक मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजतापासून हृदयस्पर्शी अशा मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी भजनातून तुकडोजी महाराज यांचे विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्त हे गुरुमाऊलींना २ मिनिटे स्तब्ध होऊन महाराजांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच, देशाच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले बलिदान दिले अशा सर्व वीर जवानांना सुद्धा मौन श्रद्धांजली वाहिली जाईल.