अमरावती -मेळघाटातील धारणी तालुक्यात ई वन वाघीण दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघिणीने आता पर्यंत अनेक जणांना जखमी केल्यामुळे तिला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी येथील आदिवासी बांधव आणि गावकरी करत आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यात वाघिणीचा धुमाकूळ; तीन शेळ्यांची शिकार, आदिवासी बांधव दहशतीत
ई वन वाघीण धारणी मुख्यालयापासून अवघ्या १५ किमीवरील रभांग गावातील शिवारात दिसल्यामुळे या परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे.
मेळघाटातील डोलार जंगलात २३ जूनला नागपूरमधील ब्रम्हपुरीवरुन ई वन वाघीण आणली आहे. ही वाघीण धारणी मुख्यालयापासून अवघ्या १५ किमीवरील रभांग गावातील शिवारात दिसल्यामुळे या परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. एका गुराख्याला अचानक १० मीटरवर वाघीण दिसली. यावेळी वाघिणीने ३ शेळ्यांवर हल्ला करत एका शेळीला जंगलाकडे नेले. घटना घडत असताना वन विभागाचे ८ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी शस्त्रे नव्हती. त्यामुळे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी वन विभागास फटकार लावत त्वरित रेस्क्यू करण्याबाबत निर्देश दिले. तसेच घटनेस गांभीर्याने घेवून लोकांच्या सुरक्षतेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.
वनविभागाने २३ जूनला या वाघिणीला डोलारच्या जंगलात सोडले होते. या वाघिणीने पहिल्यांदा २ जुलै केकदा येथे ललिता डावर या महिलेवर, कवडाझिरी येथे म्हैशीवर, गोलाई येथे रखवालदार आणि आज रभांग गावात तीन शेळ्यांवर हल्ला केला. मात्र, तरी पण वनविभागाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. वनविभागाने मेळघाट सोडून एकही रॅपिड एक्शन फोर्स किंवा रेस्क्यू टिम बोलवून वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे भविष्यात जर कोणतीही जीवित हानी झाली तर याला वनविभाग जबाबदार राहणार, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.