महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी आमदार राजकुमार पटेल यांचे नवनीत राणा यांना समर्थन - मेळघाट

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांना समर्थन दिले. मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचे काम केवळ आमदार रवी राणा करतात. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा देत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

राजकुमार पटेल आणि नवनीत राणा

By

Published : Mar 26, 2019, 10:42 PM IST

अमरावती - मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा यांना समर्थन दिले. त्यांच्या पाठिंबामुळे जिल्ह्यात अनेक चर्चां रंगू लागल्या आहेत.

पटेल हे पंधरा दिवसांपूर्वी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या सोबत मुंबईला 'मातोश्री'वर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली होती. मात्र, आज अचानक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राणा यांना समर्थन जाहीर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल

मेळघाटातील आदिवासींचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचे काम केवळ आमदार रवी राणा करतात. आदिवासींच्या सर्वात महत्वाच्या होळी सणाला आमदार राणा आणि नवनीत राणा हे मेळघाटमध्ये येवून आमच्या लोकांमध्ये सहभागी होतात, असे पटेल म्हणाले. मेळघाटात रस्ते नाही, रुग्णालय नाही. मेळघाटातील रुग्णांना उपचारासाठी अमरावतीला यावे लागते. रुग्ण २०० रुपये खर्चून अमरावतीत येतो. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याचे मृतदेह घरी नेण्यासाठी २ हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून गरिबांच्या मदतीला धावून येणारी व्यक्ती म्हणून आमदार राणा हे नेहमी आमच्या जनतेला मदत करतात, अशी माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

शिवसेनेतील काही मित्रांच्या आग्रहामुळे मी उद्धव ठाकरेंकडे मेळघाटातील समस्या घेऊन गेलो होतो. मेळघाटातील आदिवासींचे स्थलांतर करू नये. व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली मेळघाटातील आदिवासींना जंगलातून बाहेर काढू नये. आदिवासी आणि वाघ मेळघाटात सोबत जगू शकतात, असे माझे म्हणणे आहे. मात्र, ठाकरे यांनी मेळघाटातील प्रश्नांबाबत गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळेच मेळघाटातील आदिवासींशी जिव्हाळा असणाऱ्या राणा यांच्या सोबत जाण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे पटेल म्हणाले. यावेळी या पत्रकार परिषदेला नवनीत राणा आणि रोहित पटेल उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details