अमरावती -विभागात 15 जुलैपर्यंत 276.1 मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात 167 मिमी पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहे. आता 20 किंवा 21 जुलैपासून मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतात बोटभर उगवलेले पीक हातभर होण्याची आशा आहे. मात्र, पावसाने जर यावेळीही दगा दिला तर कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार अमरावती विभागात केला जात आहे.
यावर्षी 20 जूननंतर अमरावती विभागात मान्सूनचे आगमन झाले. तब्बल 13 दिवसांनी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले. आता शेतात आलेले पीक तग धरून राहाण्यासाठी एक दोन दिवसात पाऊस पडणे हाच पर्याय आहे.
अमरावती विभागात एकूण 777.9 मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. यापैकी 15 जुलैपर्यंत 276.1 मिमी पाऊस पडायला हवा असताना 167.0 मिमी इतकाच पाऊस पडला असल्याने पीक परिस्थिती गंभीर आहे.
विभागात अमरावती जिल्ह्यात आजपर्यंत 279.8 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 157.5 मिमी पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात 257.1 मिमी पाऊस हवा असताना 175.5 मिमी. पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यात 324.9 मिमी पाऊस हवा असताना केवळ 127.0 मिमी पाऊस बरसला, बुलडाणा जिल्ह्यात 288.8 पाऊस अपेक्षित असताना 160.5 मिमी पाऊस झाला तर वाशिम जिल्ह्यात 276.1 मिमी. इतका पाऊस आजपर्यंत बरसायला हवा असताना केवळ 160.5 मिमी पाऊस झाला आहे.
हवा तसा पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे. पश्चिम विदर्भात महत्वाचे पीक असणाऱ्या कापसाची लागवड 90 टक्के झाली असून सोयाबीनची पेरणी 72 टक्के झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 96 टक्के कापसाची लागवड झाली असून सोयाबीनची पेरणी 48 टक्के झाली आहे. अकोला जिल्ह्यात कापसाची लागवड 86 टक्के तर सोयाबीनची पेरणी 64 टक्के झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कापसाची लागवड 93 टक्के तर सोयाबीनची 90 टक्के पेरणी आटोपली, यवतमाळ जिल्ह्यात कापसाची लागवड 72 टक्के तर सोयाबीनची पेरणी 93 टक्के झाली आहे आणि वाशिम जिल्ह्यात कापसाची लागवड 68 टक्के आणि सोयाबीनची पेरणी 89 टक्के झाली आहे.