अमरावती - शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा जाधव यांचे पती प्रशांत जाधव यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या दालनात शाई फेकल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी आयुक्त निपाणे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. दरम्यान, साई नगर प्रभागातील ऑक्सिजन पार्कच्या भूमिपुजनाला मंजुषा जाधव यांना निमंत्रण न दिल्याने त्यांचे पती प्रशांत जाधव यांनी हे कृत्य केल्याचे समजते.
...म्हणून नगरसेविकेच्या पतीने फेकली पालिका आयुक्तांच्या दालनात शाई - शिवसेना
शिवसेनेच्या नगरसेविका मंजुषा जाधव यांचे पती प्रशांत जाधव यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या दालनात शाई फेकल्याने खळबळ उडाली. त्यांनी हे कृत्य साई नगर प्रभागातील ऑक्सिजन पार्कच्या भूमिपुजनाला पत्नी तथा नगरसेवक मंजुषा जाधव यांना निमंत्रण न दिल्याने केले असल्याचे समजते.
आज दुपारी प्रशांत जाधव महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आले आणि त्यांनी काळ्या शाईचा डबा आयुक्तांच्या दालनाच्या दारावर फेकला. यावेळी तिथे तैनात सुरक्षारक्षकांनी जाधव यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशांत जाधव यांनी सुरक्षा रक्षकांच्या अंगावरही शाई फेकली. या घटनेनंतर प्रशांत जाधव यांनी महापालिकेतून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस महापालिकेत दाखल झाले.
साई नगर प्रभागात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन झाले होते. त्या सोहळ्यात मंजुषा जाधव यांना निमंत्रण न देता भाजपच्या नगरसेवकांनीच त्या कामाचे श्रेय लुटले. याचा राग प्रशांत जाधव यांना होता. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते. मात्र, आयुक्त संजय निपाणे यांनी साई नगर येथे ऑक्सिजन पार्कचे अधिकृत उद्घाटन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा तेही महापालिकेमध्ये आले. या प्रकारच्या घटनेचा आपण निषेध करतो आणि अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही. अशी प्रतिक्रिया निपाणे यांनी यावेळी दिली. प्रशांत जाधव विरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.