अमरावती- विविध मागण्यांसाठी शहरात आज प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू यांनी केले. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता. या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आमदार बच्चू कडू यांनी प्रहार वाहन चालक संघटनेला संबोधित केले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चात सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यासह लगतच्या अकोला, वाशिम, यवतमाळ येथील वाहन चालकांना संबोधित केले. यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन सादर केले.
मोर्च्या बद्दल माहिती देताना आमदार बच्चू कडू ..... या आहेत प्रहार वाहन चालक संघटनेच्या मागण्या
राज्यातील वाहन चालकांची असंघटीत कामगार म्हणून नोंद व्हावी, किमान वेतन कायदा वाहन चालकांना लागू व्हावा, वाहन चालकांनी स्वतःच स्वतःचा रोजगार निर्माण केल्याने युवकांना रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या सरकारने वाहन चालकांना त्रास देणे बंद करावे. त्याचबरोबर परवाना धारक वाहनांची प्रवासी क्षमता वाढविण्यात यावी, इन्शुरन्स कंपन्यांकडून होणारी पिळवणूक, वाहतूक पोलिसांकडून विनाकारण होणारी कारवाई आणि आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांसह त्यांच्या दलालांकडून होणारी आर्थिक पिळवणूक बंद व्हावी, असे आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आज अमरावतीत मोर्चा काढला यानंतर नागपूरला मोर्चा निघेल. इतके करूनही सरकारला जाग आली नाही, तर मुंबईत राज्यभरातून दोन ते तीन लाख वाहन चालकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी दिला.