अमरावती- दर्यापूर तालुक्यातील येवदा गावातील इदग्गा ते लेंडीपुरा हा प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नादुरूस्त आहे. पाऊस पडला की हा रस्ता पाण्याखाली जातो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यासारखी पायाभूत सुविधाही नसल्याने प्रहार संघटनेच्या वतीने पाण्यात (सोमवारी) अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
पायाभूत सुविधेसाठी पाण्यात उतरून प्रहारचे अर्धनग्न आंदोलन शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पाणीमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तकेही भिजत आहेत. रस्त्यासारख्या मुलभूत सुविभेच्या गंभीर प्रश्नाकडे आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदिप वडतकर, शाखाप्रमुख योगेश चोरे यांसह प्रहारचे कार्यकर्ते व नागरिकांनी रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्यामध्ये बसून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बाजुनेच असलेल्या लेंडी नाल्याच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक यांनी लेंडी पुलाच्या नाल्यात पुलावर अर्धनग्न आंदोलन केले.
यावेळी आंदोलन स्थळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चौखंडे यांनी भेट दिली. यावेळी प्रदिप वडतकर यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेतबाबत सांगितले. तसेच तत्काळ रस्ता आणि पूल दुरुस्ती करावी, अन्यथा ९ ऑगस्ट रोजी लेंडी नाल्यावरील पूल तोडून टाकण्याचा इशारा यावेळी दिला.