अमरावती -महाविद्यालयीन विद्यार्थीनीचे शोषण केल्याप्रकरणी धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनवणे यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सहआरोपी करून अटक केली होती. बुधवारी त्याला अमरावतीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीकडून असा गैरप्रकार होत असेल तर तो पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारा ठरतो. यामुळे ठाणेदार रवींद्र सोनवणे याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.
6 जानेवारी रोजी धामणगाव रेल्वे येथे एका महाविद्यालयीन युवतीची सागर तितूरमारे नामक माथेफिरुने चाकू भोसकून हत्या केली होती. तसेच स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असतानाच मृत युवतीच्या आईने ठाणेदार सोनवणे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीच्या संपर्कात होते. तसेच त्याने आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केले असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. मृत युवतीच्या आईने व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान 1 जानेवारी 2020 रोजी ठाणेदार सोनवणे आणि मृत युवती या दोघांचेही मोबाइल वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे असल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही पुलगावला सोबत होते. या आधारावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत ठाणेदार सोनवणे यास मंगळवारी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास 17 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -तरुणीच्या हत्याकांडाप्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला अखेर अटक