अमरावती -लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांना काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत व भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यामधील संभाषण 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागले आहे. यशोमती यांना पराभूत करण्यासाठी पक्षातूनच लॉबिंग होत आहे, हे या कथित संभाषणातून समोर आले आहे. काँग्रेसमधील नेते आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. या फोन रेकार्डिंगमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी सूर्यवंशी आणि शेखावत यांच्यात फोनवरून चर्चा झाली. निवडणुकीत येणाऱ्या पाच कोटी रूपयांच्या खर्चावरही उभयंतात चर्चा झाली. यशोमती ह्या गेल्या २ विधानसभा निवडणुकीपासून तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. मध्यंतरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची सचिव पदाची जबाबदारीही यशोमती यांच्याकडे दिली होती. मेघालय व कर्नाटक राज्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारीही काँग्रेसने यशोमती यांना दिली आहे. यशोमती काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
संभाषणात कोण काय म्हणतंय? -
शेखावत आणि सुर्यवंशी यांच्यात फोनवरून बोलणी झाली. यात तुम्ही आधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत तिकीटचे पक्के करा. सुनील देशमुख यांच्याशी बोलता येईल. पालकमंत्री प्रवीण पोटे काय म्हणतात, असे रावसाहेब शेखावत यांनी फोन संभाषणात म्हटले आहे. निवडणूक खर्चासाठी पाच कोटींची तयारी असल्याची चर्चाही फोन संभाषणादरम्यान झाली आहे.