अमरावती - छत्री तलाव परिसरात अमरावती महापालिकेच्या वतीने पर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असा आरोप वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छत्री तलाव परिसरात होणाऱ्या पर्यटन प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला आहे अमरावती शहरात वडाळी आणि छत्री तलाव हे दोन प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात. अप्परवर्धा धरणाची निर्मिती होण्याआधी या दोन्ही तलावातून शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा व्हायचा. छत्री तलाव येथे लगतच्या पोहरा, मालखेड जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. बिबट्या, हरिण, चितळ, रान डुक्कर यांच्यासह मोर आणि विविध प्रजातींचे पक्षी पाणी पिण्यासाठी येतात.
अमरावती महापालिकेच्या वतीने छत्री तलाव परिसरात बांधकामाला सुरुवातही केली आहे. या प्रकल्पामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा आदिवास धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे आज वन्यजीवप्रेमी विविध संघटनांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्री तलाव परिसराला भेट देऊन महापालिकेकडून सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.
यावेळी उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, महाराष्ट्र राज्य जैवविविधता वन्यजीव मंडळाचे मानद वन्यजीव रक्षक किशोर रिठे, मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. जयंत वाडतकर, वन्यजीवप्रेमी निलेश कंचनपुरे, सर्वेश मराठे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती नाकाशा पुढे ठेऊन जाणून घेतली.
महापालिकेच्या या प्रकल्पात शौचालयाचे पाणी तलावात जाणार हे स्पष्ट आहे. हा प्रकल्प वन्यजीवांसाठी संकट असल्याचेही निदर्शनास आले. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून हा प्रकल्प कसा रद्द करता येईल, यासाठी पाऊल उचलण्याचा निर्णय वन विभागासह वन्यजीव प्रेमींनी घेतला आहे. येत्या काही दिवसात हा प्रकल्प बंद पडणार, की पूर्णत्वास जाणार हे स्पष्ट होणार आहे.