अमरावती- शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांचे कामे प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील महत्त्वाचा राजापेठ उड्डाणपुलाचे काम 18 महिन्यात होणार होते. पण, 5 वर्षे उलटूनही राजापेठ-दस्तूर नगर दरम्यान उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करीत आज (दि. 20 जाने.) शहरातील नवाथे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोमवारी (दि. 20 जाने.) दुपारी बारा वाजता नवाथे चौक येथे माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी अमरावती ते बडनेरा मार्गावरील वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला. नवाथे चौक येथे रस्त्यावरील दुभाजक तातडीने काढण्यात यावे, तसेच या ठिकाणी ट्राफिक सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसापासून होत आहे. राजापेठ उड्डाणपुलाचे काम 18 महिन्यात पूर्ण होणार अशी हमी दिली गेली होती. मात्र, गेल्या 5 वर्षांपासून हे काम सुरू असून संबंधित महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मनमानीमुळे अमरावतीकरांना त्रास होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.