अमरावती- दरवर्षी आषाढी वारीला माता रुक्मिणीचे माहेर तसेच प्राचीन परंपरा व संस्कृती लाभलेले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची पालखी पांडूरंगाच्या मंदिरात विणा मंडपामध्ये नेण्यात येते. भगवंतातर्फे माता रुक्मिणाला साडी-चोळीचा आहेर दिला जातो. यानंतर रुक्मिणी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ ठेवल्या जातात आणि भगवंताचा आशीर्वाद घेतला जातो. ही परंपरा मागील ४२५ वर्षांपासून सुरू आहे. पण, यंदाच्या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या पालखीला परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे ४२५ वर्षांच्या परंपरेला खंड पडू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर कमिटी व युवा विश्व वारकरी सेना यांच्यातर्फे प्रशासनला निवेदन देण्यात आले.
पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरी असे असले तरी आळंदी आणि देहूहून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पादुका दशमीला हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.