अमरावती - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना देखील बाहेरील व्यक्ती अवैधरित्या जिल्ह्यात येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजुरांचा समवेश आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रशासकिय अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारावा, अशी जनतेची मागणी आहे.
संचारबंदीतही अमरावतीत 'बाहेरच्यांची एन्ट्री'; प्रशासन 'बेखबर'
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना देखील बाहेरील व्यक्ती अवैधरित्या जिल्ह्यात येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजुरांचा समवेश आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारावा, अशी जनतेची मागणी आहे.
देशात लॉकडाऊन सुरू असल्याने राज्यासह जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, विभागीय परिक्षेत्रातील इतर जिल्हे ओलांडून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होत आहेत. संबंधित बाब गंभीर असून यासंदर्भात विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातील पोलीस आणि महसूल प्रशासनास जाब का विचारत नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, खासदार नवनीत राणा व अन्य आमदारांनी विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
चार ते पाच दिवसांपूर्वी पुण्यातून बाळापूर-आकोटमार्गे अंजनगाव सुर्जीला बारा युवक ट्रकने आले. या ठिकाणाहून ते परतवाडा मार्गे बैतूलकडे रवाना झाले. बुलडाणा आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून १९ लोक दोन दिवसापूर्वीच अंजनगाव सुर्जीतील निवारा केंद्रात दाखल झाले. जिल्ह्याच्या हद्दीत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद असताना देखील लोकांचा प्रवेश सुरू आहे. याबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.