अमरावती- जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून सर्वात जास्त रुग्ण हे राज्यात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये चालणाऱ्या कापड निर्मिती कंपन्यांमध्ये फक्त ५० टक्केच कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी कंपन्यांना दिले आहेत.
राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर कापड बनविणाऱ्या कंपन्या आहेत. रेमंड, सूर्यलक्ष्मी, व्हिएचएम, गोल्डन फायबर आदी नामांकित कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या कंपन्यांमध्ये दररोज हजारो कामगार काम करतात. यातील काही कंपन्यांमध्ये महिला कामगार सुद्धा आहे. असे असताना कोरोना विषाणूचा विस्तार लक्षात घेता या कंपन्यात काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी ५० टक्के कामगारांनी टप्या टप्यात काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिले आहे.