महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

6 महिन्यांपासून लेकराची भेट नाही; अमरावतीत आरोग्यसेवक बजावताहेत अविरत सेवा

अमरावती येथील मोगर्दाच्या उपकेंद्रातील आरोग्यसेवक राजेंद्र चकुले यांच्या घरी 6 महिन्यांची चिमुकली आहे. 6 महिन्यांपासून ते घरी गेले नाहीत. ते कोरोना रूग्णांची अविरत सेवा करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी केले आहे.

amravati
अमरावती

By

Published : May 10, 2021, 7:32 PM IST

अमरावती -घरी 6 महिन्यांची चिमुकली; पण कोरोना साथीमुळे तिची महिनोनमहिने भेट होत नाही. कुटुंबियांशी संवाद होतो, तोही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. मात्र, साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रुग्णसेवेत खंड पडू दिला नाही. अशी सेवा मोगर्दाच्या उपकेंद्रातील आरोग्यसेवक राजेंद्र चकुले हे करत आहेत. त्यांची ही निरंतर सेवा पाहून धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनीही राजेंद्र यांचे कौतुक केले.

राजेंद्र चकुले हे मुलीच्या जन्मानंतर एकदाच घरी जाऊ शकले. त्यानंतर 6 महिने त्यांचा कुटुंबियांशी केवळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी नुकतीच येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेव्हा त्यांना ही माहिती मिळाली.

चकुले यांची कर्तव्यनिष्ठा पाहून प्रकल्प अधिकारी गहिवरल्या

गत आठवड्यात कोविड केअर सेंटरमध्ये मिताली सेठी पोहोचल्या. तेथे एका रूग्णाचा चकुले यांच्याशी वाद झाल्याचे त्यांना आढळले. आपल्याला घरी जायला परवानगी मिळावी, असे रूग्णाचे म्हणणे होते आणि अजूनही रुग्णाला काही दिवस सेंटरमध्ये थांबण्याची आवश्यकता असल्याचा राजेश चकुले यांचा आग्रह होता. त्यावेळी चकुले हे प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हणाले की, "मॅडम, पेशंटला केअर सेंटर थांबण्याची गरज होती. कारण, त्याची जोखीम पुरेशी कमी झालेली नव्हती. या रुग्णाला घरी सोडण्याबाबत इतरांचेही फोन आले. मात्र, मी सगळ्यांना साफ नकार दिला. स्पष्ट सांगितले की, कोणाचाही फोन येवो, रुग्णाचा उपचार कालावधी संपल्याशिवाय व प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे".

आरोग्यसेवकाची ही कर्तव्यनिष्ठा पाहून प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. राजेंद्र चकुले हे निरंतर सेवा बजावत असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आपण जोखमीच्या ठिकाणी काम करतो. आपल्या कुटुंबाला व चिमुकलीला आपल्यापासून संसर्ग होऊ नये म्हणून घरी जात नसल्याचे सांगताना राजेंद्र चकुले यांचे डोळे पाणावले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या घटनेचा आपल्या फेसबुकवरील लेखनात विशेष उल्लेख केला आहे.

कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहनाची गरज

धारणी येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विकास गवई हेही अविरत सेवा देत आहेत. त्यांचाही कौतुकास्पद उल्लेख प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला आहे. 'आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन खंबीरपणे अविरत रूग्णसेवा देत आहेत. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोनावर मात करता येईल', असे मिताली सेठी यांनी सांगितले.

हेही वाचा -दादरच्या गुरुद्वारात 'ऑक्सिजन लंगर', १० लाखांपेक्षा जास्त लोकांना दिले जेवण

हेही वाचा -सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून

ABOUT THE AUTHOR

...view details