अमरावती :फार पूर्वी राजस्थानमधून अनेक कुटुंब हे विदर्भातील विविध भागात स्थायिक झालेत. तिवसा तालुका आणि परिसरातदेखील राजस्थानातील अनेक राजपूत कुटुंबं आली होती. तिवसा येथील ताजी या राजपूत कुटुंबाची कुलदैवत राजस्थानमधील सवाई माधवपुर जवळ असणाऱ्या लालसोट गावात आहे.
ताजी कुटुंबातील पूर्वज सितारामसिंह ताजी साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी राजस्थानमध्ये गेले असता त्यांनी तिथून श्री पिपलाज देवीचे दोन दगडी मुखवटे सोबत आणले. वाटेत ते कुऱ्हा या गावात रात्री मुक्कामी होते. सकाळी दिवसाकडे निघताना देवीचे मुखवटे ज्या कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवले होते, त्या ठिकाणाहून हललेच नाहीत. यामुळे ज्या ठिकाणी देवी विराजमान झाली. त्याच ठिकाणी ताजी कुटुंबाच्या वतीनं मातीचं मंदिर बांधण्यात आलं. तेव्हापासून ही पिपलाज देवी कुऱ्हा येथे आहे, अशी माहिती ताजी कुटुंबातील सदस्य आणि या मंदिराचे विश्वस्त स्वर्गीय सुरेशसिंह ताजी यांच्या पत्नी अलकाताजी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात नवरात्रौत्सव थाटात साजरा होतो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी या स्वर्गीय सुरेशसिंह ताजी यांच्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असंदेखील अलका ताजी यांनी सांगितलं.
निजामशाहीत देवीच्या मिरवणुकीवर बंदी : तीनशे वर्षांपासून पिपलाज देवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होत असताना निजामशाहीत असणाऱ्या कुऱ्हा येथील या मंदिरातून नवमीच्या दिवशी गावात निघणारी मिरवणूक 1920 मध्ये बंद करण्यात आली होती. देश स्वतंत्र झाल्यावर 1951 मध्ये नवरात्रौत्सवात नवमीच्या दिवशी या देवीची मिरवणूक पुन्हा एकदा मंदिरातून गावात सुरू झाली, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त संदीप राजपूत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. गावात पिपलाज देवी ही मोठी देवी आणि दुसरी लहान देवी असे देवीचे दोन मंदिरं आहेत. लहान देवी ही बुंदेलखंडी राजपुतांनी आणली असल्याची माहितीदेखील संदीप राजपूत यांनी दिली. या दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त रोज सकाळी आणि सायंकाळी साडेसहा वाजता आरती होते. या आरतीला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर राहतात. नवमीला गावात मोठा उत्सव असतो. ज्यांना राजस्थानमध्ये पिपलाज देवीच्या दर्शनाला जाणे शक्य नाही. असे सर्व राजपूत बांधव कुरा येथील देवीच्या दर्शनासाठी येतात असे संदीप राजपूत यांनी सांगितलं.