अमरावती - माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात अमरावती लोकसभा मतदार संघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचाच माहौल होता. विशेष म्हणजे हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अमरावतीचे पहिले महापौर आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान डॉ. देवीसिंह शेखावत यांनी नवनीत राणा यांना विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला.
.माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात नवनीत राणा यांचा माहौल मेहेफिल इन हॉटेलच्या बंधन लॉन येथे हा सोहळा मंगळवारी रात्री आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पश्चिम विदर्भातील विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थिय होते.
या सोहळ्यात नवनीत राणा यांनी मला सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. अमरावतीच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन. एक महिला म्हणून अमरावतीच्या समस्या सोडविण्यासाठी माझा सदैव पुढाकार असेल असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
सोहळ्यानंतर नवनीत राणा यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली. माझ्यासोबत पण सेल्फी काढा अशी विनंती हर्षवर्धन देशमुख यांनी नवनीत राणा याना करताच हास्य विनोदाचे कारंजे उडाले.
सोहळ्याला माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, माजी आमदार राबसाहेब शेखावत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य वसंत घुईखेडकर, प्रा हेमंत देशमुख, अॅड. श्रीकांत खोरगडे यांच्यासह शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.