अमरावती: गणणेसाठी जंगलात केल्या जाणाऱ्या 'निसर्ग अनुभव' या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून वन्यजीव प्रेमींना अख्खी रात्र घनदाट जंगलात मचानावर बसून काढण्याचा अनुभव घेता येतो. अनेक वर्षांपासून वन विभागाच्या वतीने हे आयोजन केले जात आहे.
वन्यजीवप्रेमींसाठी आनंददायक अनुभव: बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जंगलात प्राणी गणना करण्यासाठी वनविभागाच्या वतीने वन्यजीव प्रेमींसाठी जंगलात खास मचानांची व्यवस्था केली जाते. गतवर्षीपर्यंत साडेसातशे ते बाराशे रुपये शुल्क आकारून वन्यजीव प्रेमींना 'निसर्ग अनुभव' या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळायची. पहिल्या दिवशीचे आणि रात्रीचे जेवण तसेच दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता वनविभागाच्या वतीने उपलब्ध करून दिला जायचा. जंगलातील मचानावर दोन वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचा एक कर्मचारी असे तिघेजण रात्रभर राहू शकेल, अशी व्यवस्था असायची. पानवट्याजवळ उभारण्यात येणाऱ्या या मचानावरून रात्रीच्या अंधारात कोणकोणते प्राणी पानवट्यावर येतात त्याची नोंद वन्यजीव प्रेमींना करावी लागते. त्यांच्यासाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय आनंदाचा असतो. विशेष म्हणजे, मेळघाटात महाराष्ट्रात सर्व दुरून वन्यजीवप्रेमी 'निसर्ग अनुभव' या उपक्रमात सहभागी होतात.
यावर्षी असे आहेत 'बोर्डिंग पॉईंट': 'निसर्ग अनुभव' या उपक्रमांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागात बोर्डिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. ऑनलाइन आरक्षणासाठी 132 मचानांची व्यवस्था असून 'व्हीआयपी'साठी 24 मचान आरक्षित ठेवण्यात आले आहेत.