महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 28, 2019, 11:02 AM IST

ETV Bharat / state

पाणी समस्येवर आपला परिवार समजून कामे करा; खासदार नवनीत राणांचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत राबवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. खासदार नवनीत राणा यांनीही जिल्ह्यातील पाणी प्रश्न हा आपल्या परिवाराचा प्रश्न आहे, असे समजून त्यांचे निवारण करण्याचे आवाहन नवनीत राणा यांनी केले

खासदार नवनीत राणा

अमरावती- जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता तीव्र आहे. आपला परिवार समजून जिल्ह्यातील पाण्याच्या समस्येवर काम करा, तसेच त्यासंदर्भात योग्य असा पाठपुरावा करण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी सर्व अधिकाऱ्यांना केली. खासदार म्हणून नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदाच बैठक घेतली.

पाणी समस्येवर आपला परिवार समजून जिल्ह्यात कामे करा; खासदार नवनीत राणांचे आवाहन

जिल्ह्यात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ आहे. पाणी प्रश्नासंदर्भात नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींचे अनेक सदस्य आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोनडा, नागापूर, मोगर्डा, टेलघाट, मोरपाटी, रुईपठार, तेंब्रू, सावरपानी या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. धारणी तालुक्यातील चौराकुंड येथील ठक्करबाप्पा योजनेचा निधी संपला आहे. चित्री गावतही पाण्याची भीषण स्थिती असल्याचे बैठकीत समोर आले.

अमरावती तालुक्यात ब्राम्हणवाडा गोविंदपूर या गावात दोन मुले पाण्यासाठी विहिरीत उतरले आणि त्यांनी प्राण गमावले मात्र, प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रकाश साबळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विहिरीतला गाळ उपसला असता तर ही दुर्घटना टाळली असती असे प्रकाश साबळे यांचे म्हणणे होते.

शासनाच्या नियमानुसार 200 फुटांपर्यंतच बोर खोदता येते. 200 फुटांवर पाणी लागले नाही तर पैसे, वेळ वाया जातो त्यामुळे बोर हे 300 फुटांपर्यंत खोदण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गुरुदेवनगर येथे पाणी नाही. सरपंच, उपसरपंच, सचिव जाब द्यायला समोर येत नाही, अशी तक्रार संजय देशमुख यांनी बैठकीत केली. पाणीपट्टी भरली नसल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याच्या तक्रारी बैठकीत समोर येताच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या आरोपांचे खंडन करून शासनाने जिल्ह्यातील 4 कोटी रुपयांची भाडेपट्टी माफ केली. ती रक्कमही जमा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्तरगाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील प्रत्येक घराने 190 ते 200 रुपये पांणीपट्टी भरणे आवश्यक असून त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आम्हाला हवा असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा कंत्राटदारांना महत्तव देतात. रात्री कंत्राटदारांसोबत दारू पितात अशी तक्रार आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.

बैठकीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत राबवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. खासदार नवनीत राणा यांनीही जिल्ह्यातील पाणी प्रश्न हा आपल्या परिवाराचा प्रश्न आहे, असे समजून त्यांचे निवारण करा. जे काही कागदपत्रे हवेत त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details