अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवद्वितीय आहेत. ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत. म्हणून महापुरुषांची विटंबना केल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला आहे. तसेच दगडाला शेंदूर फासण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सूर्याला आवरण चढवण्याचा प्रयत्न केला, तर भस्म झाल्यावाचून राहणार नाही, अशी टीकाही कोल्हे यांनी केली आहे. खासदार कोल्हे अमरावती येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी (12 जानेवारीला) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. यावर कोल्हे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.