अमरावती - तुम्ही जनतेचे कामे केले नाही तर तुम्हाला पुढच्या वेळेस युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवारी मिळणार नाही. तुम्ही विचार करत राहाल की, मोदीजी तुमच्यासोबत आहेत. पण स्वाभिमान पक्ष सोबत नसला तर तुमचे काही खरं नाही. म्हणून फक्त काम करा, असा मिश्किल टोला युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी पत्नी खासदार नवनीत राणा यांना लगावला. यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. सध्या नवनीत राणा यांनी भाजपासोबत जवळीक साधली असून त्या भाजपामध्ये जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
अचलपूर तालुक्यातील हुतात्मा जवान कैलास दहिकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित भव्य रक्तदान शिबिरात आमदार रवी राणा बोलत होते. यावेळी खासदार नवनीत राणा या देखील उपस्थित होत्या. अमरावतीत फिनले मिल, मेडिकल कॉलेज सुरू करा, विमानतळ सुरू करा, अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या स्तरांवर लढायचं आहे तिथे आवाज उठला, असा सल्ला ही आमदार रवी राणा यांनी खासदार नवनीत राणा यांना दिला.
पुढे बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, तुम्ही नवनीत राणा यांना 'पाना' या चिन्हावर निवडून आणले. अनेक लोक म्हणतात, शरद पवार हे रवी राणा यांच्यासोबत नाहीत. परंतु त्यांनी मला दोन निवडणूकीत पाठिंबा दिला आणि त्यांचा सन्मान हा आमच्या हृदयात आहे. त्यांच्यापासूनच मी राजकीय खेळ्या शिकलो, असे ही रवी राणा म्हणाले.