अमरावती:संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. अपात्र ठरलेल्या १६ आमदारांच्या निर्णयाचे प्रकरण पुन्हा एकदा सभापतींसमोर आले. तर अंतिम निर्णय 7 सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे. या निर्णयामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा चुराडा झाला असल्याची प्रतिक्रिया, बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
न्यायालयाची शिंदे सरकारच्या पाठीवर थाप: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अनेक राजकिय नेते प्रतिक्रिया देत आहे. शिवसेनेचे 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडले होते. या सर्व राजकीय घडामोडी नंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आज संपूर्ण देशवासीयांचे दैवत असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो निर्णय म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीवर थाप असल्याचे देखील आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.