अमरावती: शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यात दूध दरवाढीच्या मागणीचे आंदोलन झाले. अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून तर कुठे देवाला अभिषेक घालून हे आंदोलन करण्यात आले. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार असलेले अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच दोन गट असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, दूध दरवाढी संदर्भात या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याने या आंदोनात सहभागी झालो नसून येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याची प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.
स्वाभिमानीच्या एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाकडे पाठ, चर्चेला उधाण - Amravati breaking news
राज्यात आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विविध प्रकारच्या चर्चेचा उधाण आले आहे.
काय म्हणाले आमदार देवेंद्र भुयार
दुधाच्या व दूध भुकटीच्या दरवाढी बाबतीत मी या पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले होते. अजित पवारांनी सांगितले होते की तयार झालेली दूध भुकटी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यामुळे आपण दुधाला भाव देऊ शकत नाही .पण, भूटकीला भाव देऊ शकतो. त्यामुळे ही आंदोलन करण्याची वेळ नाही, असे त्यांनी मला सांगितले असल्याचे आमदार भुयार म्हणाले. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की ही तुमची मागणी रास्त आहे. पण, आंदोलनाची वेळ नाही म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो नाही, असेही आमदार भुयार म्हणाले. दुधाच्या विषयावर मी या अधिवेशनात बोलणार आहे आणि पहिला मुद्दा माझा दुधच राहणार आहे, असेही देवेंद्र भुयार म्हणाले.
दरम्यान, राज्यात आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणारे आमदार देवेंद्र भुयार आता मात्र राजू शेट्टींच्या आंदोलनापासून लांबच राहत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.