मेळघाटातील 24 गावांचा अंधार दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी लढा देणार - बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मेळघाटातील दुर्गम गावांना भेट दिली. यात त्यांनी, त्या गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारशी लढा उभारणार असल्याचे सांगितले.
अमरावती -मेळघाटात आजही 24 गावं अंधारात आहेत. माखला गावात भरपूर लोकसंख्या असताना या गावतही वीज पोचली नाही. या भागात वीज पोचविणे आमचे कर्तव्य आहे आणि यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करणार. खरं तर वन विभागाच्या अडथळ्यामुळे दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडसर निर्मण होतो आहे. वन विभाग केंद्र शासनाच्या अधिकाराचा भाग असून अंधारात बुडालेल्या गावांचा अंधार दूर करण्यासाठी केंद्र सरकारसोबत लढा देणार, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
माखला गावात बच्चू कडू यांचे जल्लोषात स्वागत
चंदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी स्थित संत गाडगेबाबा मिशनच्या निवासी आश्रम शाळेच्यावतीने माखला या मेळघाटातील दुर्गम भागात आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाची जनजागृती व्हावी, आदिवासीं भागातील रहिवाशांनी मुलांना आश्रम शाळेत शिक्षणासाठी पाठवावे यासाठी जनजागृती सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमानिमित्त बच्चू कडू गावात आले असता त्यांचे ग्रामस्थ आणि संत गाडगेबाबा मिशनच्या आश्रम शाळेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मेळघाटच्या आमदार राजकुमार पटेल हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.