अमरावती- शहरा लगतच्या १६ किलोमीटरवरील १० हजार लोकसंख्या असलेल्या अंजनगाव बारी गावाला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. अशात या गावकऱ्यांच्या मदतीला गावापासून काही अंतरावर शेती करणारे रवींद्र मेटकर बंधू धावून आले आहेत. त्यांनी आपल्या शेतातल्या कुंपनलीकेतून पाणी मार्च महिन्यापासूनच गावाला देणे सुरू केले असून ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम ते करत आहेत.
अत्यल्प पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी हे गाव त्यातीलच एक आहे. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कोंडेश्वर तलावाजवळ आणि मेघे इंजीनीअरींग कॉलेजजवळ ग्रामपंचायत प्रशासनाने तयार केलेल्या विंधन विहीर आटल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी गावापासून काही अंतरावर शेती करणार्या अमरावतीच्या रवींद्र आणि दिलीप मेटकर यांच्याशी संपर्क साधला.