अमरावती :नवसाला पावणाऱ्या गणोजा देवी येथील महालक्ष्मीच्या मंदिरात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. अमरावतीसहलगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला या जिल्ह्यातील गणोजा देवी येथील महालक्ष्मी कुळदैवत आहे. कुळदैवत असणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांचे जावळे हे महालक्ष्मीच्या मंदिरातच काढण्याला अधिक महत्त्व असल्याने भाविक लहान बाळांना घेऊन मंदिरात येतात. यासह आपल्या मनातील इच्छा देवीला नवस केल्याने पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
अशी आहे प्रथा :मंदिरात येणारे भाविक आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी मंदिरामध्ये सात किंवा नऊ नारळ बांधून नवस बोलतात. वर्षभरात हा नवस पूर्ण झाला की, देवीचा हा नवस फेडण्यासाठी भाविक पुरणपोळीचा नैवेद्य देवीला चढवतात. पुरणपोळीचा मान गणोजा देवी येथील महालक्ष्मीला आहे. अनेक भाविक आपला नवस फेडण्यासाठी मंगळवारी मंदिरामध्ये पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करतात. मंदिरात भाविकांना निवासाची व्यवस्था आहे. तसेच स्वयंपाक करण्यासाठीची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहे. मंदिर संस्थांच्या वतीने संपूर्ण सेवा सुविधा असल्यामुळे मंदिरात भाविकांना आपला नवस फेडण्यात कुठलीही अडचण येत नाही. नवस फेडण्याच्या निमित्ताने मंदिरामध्ये दर मंगळवारी तसेच पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येतात.
गणोजाला आहे साक्षात कोल्हापूरची महालक्ष्मी :गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी ही साक्षात कोल्हापूर येथील महालक्ष्मी असल्याची मान्यता आहे. गणोजा देवी येथील गाभाऱ्यात असणारी महालक्ष्मी आणि कोल्हापूर येथील मंदिरात असणाऱ्या महालक्ष्मीचे रूप यात कुठलीही तफावत नाही. फार पूर्वी गणोजा देवी परिसरातील गणू नावाचे महालक्ष्मीचे भक्त दरवर्षी कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी जायचे. वृद्धावस्थेत असताना आता मी इतक्या दूर कोल्हापूरला दर्शनासाठी येऊ शकणार नाही, असे गणू महाराज महालक्ष्मीला म्हणाले असताना मीच तुझ्या गावी येते असे महालक्ष्मी गणू महाराजांना म्हणाली. तुझे गाव येईपर्यंत तू मागे पाहायचे नाही, अशी अट महालक्ष्मीने घातली होती. मात्र गणोजा गावाजवळ गणू महाराजांनी आपल्या मागे महालक्ष्मी खरंच आहे की नाही, यासाठी मागे पाहिले असताना साक्षात महालक्ष्मी त्यांच्यामागे होती.
गणोजा देवी येथील महालक्ष्मीचे दर्शन :गणू महाराजांनी मागे वळून पाहिल्यामुळे महालक्ष्मी आहे, त्याच ठिकाणी विराजमान झाली. आज त्याच ठिकाणी महालक्ष्मीचे मंदिर उभारण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. विदर्भातील ज्या भाविकांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे किंवा महालक्ष्मीला नवस फेडण्यासाठी जाणे शक्य नाही, त्या भाविकांनी गणोजा देवी येथील महालक्ष्मीचे दर्शन घेतले किंवा या ठिकाणी नवस फेडला, तर तो कोल्हापूर येथील महालक्ष्मीलाच पावतो. अशी मान्यता असल्याची माहिती गणोजा देवी येथील रहिवासी दीपाली बिजवे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग