अमरावती : देशात गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने यावर्षी देखील लॉकडाऊन करावा लागला. लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे, याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे लॉकडाऊनमधून किराणा व धान्य दुकानांना सूट देण्यात आली होती. परंतु सूट देऊन सुद्धा मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया किराणा व्यवसायिकांनी दिली आहे.
लॉकडाऊन लावल्यामुळे किराणा व्यवसायिकांवर ही अनेक निर्बंध आले होते. किराणा दुकान उघडण्यासाठी वेळेची मर्यादा आखून दिली होती. त्यामुळे वेळेतच दुकान चालवणे हे दुकानदारांना बंधनकारक होते. परंतु किराणा दुकानात येणारे हे ग्राहक दिवसभर येत असतात, लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे वेळेची बंधने आली. त्यामुळे ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वाहतूक बंद होती, त्यामुळे वेळेवर माल दुकानात पोहोचत नव्हता, तसेच वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाल्याचे या व्यवसायिकांनी सांगितले आहे.
केवळ किराणा मालाच्या विक्रीसाठीच परवानगी
शासनाने वेळोवेळी नियमात बद केले, नव्या नियमानुसार कधी दुकान सुरू ठेवावे लागायचे तर कधी बंद. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या नियमित ग्राहकांची देखील गैरसोय झाली. त्यांच्या सख्येतमध्ये घट झाली. अनेकवेळा मालाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे चढ्यादराने माल खरेदी करावा लागायचा. मालाचे दर वाढल्याने ग्राहकांना सुद्धा त्याची आर्थिक झळ बसायची. तसेच शासनाने फक्त किराणा मालाच्या विक्रीसाठी परवानगी दिली होती, त्यामुळे किराणा सोडून स्टेशनरी सारख्या इतर वस्तू आम्ही विकू शकलो नाही, याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाल्याचेही दुकानदारांनी सांगितले.