महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Journey For Bull Sell: बैल विक्रीसाठी मध्य प्रदेश ते अचलपूर असा 'त्यांचा' तीनशे किलोमीटरचा प्रवास - Lohar community peoples migration

मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर मिळणारे खास तगडे गावठी बैल घेऊन मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात येणाऱ्या अब्दुल गनी या गावासह लगतच्या काही गावांमधील लोहार बांधव दरवर्षी जवळपास तीनशे किलोमीटर अंतर पायी चालून अमरावती जिल्ह्यातील अचलपूरची बैल विक्रीसाठी बाजारपेठ गाठतात. 40 ते 50 कुटुंबाचा जंगलातील खडतर प्रवास करून दोन अडीच महिने बैलांना ग्राहक शोधणे बैल विकणे आणि योग्य मोबदला मिळाल्यावर परत जाणे, असा गत आठ ते दहा वर्षांपासून नित्यक्रम सुरू आहे. याबद्दल अधिक सविस्तर या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Journey For Bull Sell
लोहार बांधवांचा बैल विक्रीचा प्रवास

By

Published : Jun 5, 2023, 1:31 PM IST

लोहार बांधवांचा बैल विक्रीचा प्रवास

अमरावती :मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर वसलेल्या अनेक गावांमध्ये लोहार समाज बांधव आहेत. 90 टक्के अशिक्षित असणाऱ्या या समाजाकडे त्यांच्या गावात कुठलीही शेतजमीन नाही. उदरनिर्वाह करिता लोहार कामासोबतच बैलांची खरेदी विक्री करणे हा त्यांचा मुख्य उद्योग आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर मिळणारे बैल हे अतिशय तगडे आहेत. शेतात काम करण्यासाठी ते उपयुक्त आहेत. या बैलांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असून हे बैल महाराष्ट्रातील बैलांपेक्षा अधिक कष्ट करणारे आहेत. यामुळेच मध्य प्रदेशातील या लोहार समाज बांधवांकडून दरवर्षी अचलपूरच्या बाजारात येणाऱ्या 400 ते 500 बैलांची विक्री होत असते.



बैल विक्रीसाठी भटकंती :मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात येणाऱ्या गोहरगंज तालुक्यातील अब्दुल गनी या गावातील लोहार समाजाचे 30 ते 40 कुटुंब 400 ते 500 च्या संख्येत असणाऱ्या बैलांना घेऊन आठ दहा दिवसांचा प्रवास मेळघाटच्या जंगलातील खडतड वाटेतून पूर्ण करून अचलपूर परिसरात येतात. कुटुंबातील पती-पत्नी त्यांचे आई-वडील लहान मुले, अनेकदा गर्भवती महिला असे संपूर्ण बिऱ्हाड बैल विक्रीसाठी भटकंती करत येते. मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर 25 ते 30 हजार रुपयांची बैल जोडी अचलपूरला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत विकली जाते. अचलपूरसह अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी या भागातील शेतकरी देखील बैल खरेदी करण्यासाठी येतात. बैलांची विक्री करणे आणि त्यानंतर या पैशांची वसुली होणे, अशा या सर्व व्यवहारासाठी कधी पंधरा दिवस तर कधी दीड- दोन महिने देखील वाट पाहावी लागत असल्याची माहिती जितेन लोहार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.


आंध्र प्रदेश, तामिळनाडूपर्यंत भटकंती :एप्रिल, मे महिन्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर बैलांची खरेदी केल्यावर जून जुलै महिन्यापर्यंत अचलपूरच्या बाजारात बैल विक्री करणे यासह बैलांची अदलाबदल करणे, असा व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी पैसा मिळणाऱ्या लोहार समाजाला मध्य प्रदेशात इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. आरक्षणाची कुठलीही सुविधा नसल्यामुळे जे काही सात-आठ टक्के मुले शिक्षण घेत आहेत, त्यांनाही नोकरी नाही. अशा परिस्थितीत पारंपारिक पद्धतीने लोहार कामाद्वारे अवजारे तयार करणे आणि विकणे हा उद्योग देखील लोहार समाज बांधव करतात. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू पर्यंत दरवर्षी आम्ही भटकंती करून अवजार विकतो. वर्षातून केवळ दोन ते तीन महिने घरी राहतो. दिवाळी साजरी केली आणि घरी दिवे लावले की आम्ही घराबाहेर पडतो आणि तेव्हापासून आमची कायम भटकंती सुरू राहते, असे प्रेमबाई लोहार 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या.



अनेक संकटांचा सामना :रखरखत्या उन्हात नवजात बाळापासून 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत गावातील सारेच इतक्या लांबचा प्रवास पायी चालत करतात. अचलपूर लगत रिकाम्या मैदानावर बैलांसह यांची उघड्यावरच राहुटी फाटली जाते. दुरून कुठून तरी पिण्याचे पाणी आणणे. जेवणासाठी पोळ्या कधी निखाऱ्यावर बिबट्या भाजणे डाळ शिजवली जाते. अनेकदा पोलिसांचा देखील त्रास सहन करावा लागतो. आमच्यासोबत असणाऱ्या एका कुटुंबाचे दहा बैल पोलिसांनी कारण नसताना जप्त केले. हातचे पशुधन पोलिसांनी जप्त केल्यामुळे त्या कुटुंबातील सर्वांची परिस्थिती रडून बेजार झाली आहे. मात्र आम्ही काहीही करू शकत नाही. आमच्याजवळ शेती नाही स्थायी व्यवसाय नाही आम्ही प्रामाणिकपणे बैल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो, असे असताना आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल कोणीही घेत नसल्याची खंत रानीबाई लोहार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. Two People Killed In Bull Strike : बैलांच्या शर्यती दरम्यान धडक लागून दोघांचा मृत्यू
  2. Bull on Grampanchayat : शेतात जायला रस्ता मिळेना, शेतकऱ्याने बैल बांधला थेट ग्रामपंचायतच्या दारात
  3. Pakhe Family Bull Aurangabad बैलांच्या देखभालीसाठी महिन्याला लाखोंचा खर्च; खुराक ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details