अमरावती :सध्या जंगलात सगळीकडे पानगळ झाल्यामुळे माळरान ओसाड झाले आहे. या ओसाड माळारानातील पानवठ्यावर निळ्या रंगाचा सुंदर असा पक्षी आढळून येतो आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात पाहुणा म्हणून हा पक्षी येत असल्याची माहिती वन्यजीव प्रेमी देतात. दोन महिन्यासाठी अमरावतीच्या जंगलात पाहुणा म्हणून येणाऱ्या या पक्षाचे नाव वेडा राघू असे आहे. सध्या वेडा राघू या पक्षाने जंगलातील सगळ्यांना वेड लावल्याचेच दिसून येत आहे.
काय आहे वेडा राघू पक्षाचे वैशिष्ट्य :झाडाच्या फांद्यांवर, एखाद्या भिंतीवर आणि विजांच्या तारावर बसून सहज उडणारे कीटक हवेतच बसून पकडण्याची कला वेडा राघूमध्ये आहे. वेडा राघू हा पक्षी चिमणीच्या आकाराचा आहे. मात्र या पक्षाची शेपटी ही लांब आणि आकर्षक असते. हा पक्षी हवेत उडणारे कीटक आणि मधमाश्या खातो. यामुळे इंग्रजीमध्ये त्याला लिटिल ग्रीन बीटर अर्थात मधमाशा खाणारा लहान हिरवा पक्षी असे म्हणतात. या पक्षाच्या डोक्यावर आणि मानेवर सोनेरी आणि तपकिरी रंगाचे मिश्रण तर चोचीखाली निळा रंग असतो. या पक्षाच्या गळ्यावर आडवा काळ्या रंगाचा बारीक पट्टा असतो. या पक्षाच्या डोळ्याजवळही काळा पट्टा असतो. या पक्षाचे डोळे लालसर असून पक्षाची चोच ही काहीशी बाकदार आहे. शरीराच्या मानाने या पक्षाची चोच लांब वाटते आणि शेपूट सुद्धा लांब असते.
कोणता असतो वेडा राघूचा विणीचा काळ :मार्च आणि एप्रिल हा वेडा राघू पक्षाच्या विणीचा काळ असून या काळात तो विशेष प्रकारचे घरटे तयार करतो. या घरट्यांमध्ये मादी एकाच वेळेस पांढऱ्या रंगाची तीन ते पाच अंडी घालते. अंडी उबवणे आणि पिल्लांचा सांभाळ करणे ही दोन्ही कामे नर आणि मादी मिळून करतात. हे पक्षी समूहाने रहात असून या पक्षांचे थवे अनेकदा एखाद्या झाडावर पानवठ्यावर तर कधी मानवी वस्तीत देखील आढळून येतात.
अमरावती जिल्ह्यात 295 च्यावर पक्षी :अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून येतात. जिल्ह्यात 295 च्यावर पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती पक्षी निरीक्षक यादव तरटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. वेडा राघू हा पक्षी एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात येतो. दरवर्षी सुमारे 100 च्या संख्येत हे पक्षी जिल्ह्यात येतात. हे पक्षी समूहाने स्थलांतरण करतात. समूहानेच हे पक्षी आपले घरटे तयार करतात. वेडा राघू पक्षी कीटक नियंत्रण करण्याचे काम करतात. वेडा राघू हा कीटक भक्षक पक्षी आहे. त्यामुळे जैवविविधतेमध्ये वेडा राघू या पक्षाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वेडा राघूचे अमरावती जिल्ह्यातील आगमन हे जिल्ह्यातील पक्षी वैभवात अतिशय महत्त्वाचे मानले जाते, असे देखील यादव तरटे यांनी यावेळी सांगितले.