अमरावती -निवडणुकीचा काळ म्हणजे दारू पिणाऱ्यांसाठी सुवर्ण काळच. त्यातही देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तर दारूला महापूर येतो. अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू पिण्याचा आणि पाजण्याच्या मैफिली चांगल्याच रंगात आल्या आहेत.
आधी टोकन मग बाटली
अमरावती लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या २४ पैकी चार पाच उमेदवार सोडले तर कोणाचा नाव पत्ताही मतदारांना ठाऊक नाही. असे असले तरी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची सोय मात्र लावली जात आहे. बूथवर दिवसभर बसणारे, रॅली काढण्यासाठी गर्दी जमविणारे, पत्रक वाटणारे यांच्यासाठी रात्री घरी जाताना दारूची सोय लावणे हे तर जणू उमेदवाराचे आद्य कर्तव्य ठरत आहे. कार्यकर्त्यांच्या हातात थेट दारूची बाटली न ठेवता त्याला एक टोकन दिले जाते. हे टोकन ठरलेल्या दारू विक्रेत्याकडे दिल्यावर बरोबर एक बाटली कार्यकर्त्याला मिळते. अशी व्यवस्था झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांसाठी आहे. सुशिक्षत कार्यकर्त्यांना थोडी वरच्या दर्जाची ट्रीटमेंट दिली जात आहे. अशा कार्यकर्त्यांसाठी ठरलेल्या बारचे टोकन दिले जाते. आता राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दारू विक्री बंद असली तरी यापूर्वीच दारूचा स्टॉक केला जात आहे.
'मोहाच्या' दारूचा सुळसुळाट
मतदार संघातील अमरावती, अचलपूर, तिवसा, बडनेरा, दर्यापूर, या विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि मतदारांना पैसा आणि दारूची अवैध मार्गाने पोहच केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दहाही पोलीस ठाण्या अंतर्गत विविध ठिकाणी नाका बंदी करून कारवाई केली जात आहे. येणाऱ्या काळात धाडसत्रही राबविले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली. अमरावतीसह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पोलीस पैसे आणि दारू साठ्यावर नजर ठेवून आहेत. मेळघाट मतदारसंघात येणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात त्याच भागात मिळणाऱ्या मोहाच्या दारूचा सुळसुळाट आहे. ही दारू शहरी भागात अवैध मार्गाने आणण्याचा प्रतापही काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे.