अमरावती :आतापर्यंत आपल्याला रंग बदलणारे प्राणी माहित होते, पण रंग बदलणारे झाड देखील अस्तित्त्वात आहे. हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो. 24 तासात तीन वेळा रंग बदलणारा हा भुत्या काही खरोखरचा भूत नाही किंवा कोणता प्राणी नाही, तर चक्क एक झाड आहे. सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात अनेक ठिकाणी हा भुत्या आढळतो. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा वेगवेगळ्या रंगात हा भुत्या दिसतो, तो हिवाळ्यात गुलाबी आणि पावसाळ्यात गर्द हिरव्या रंगाचा होतो.
'असे' आहे भुताचे झाड :दुरून चक्क चांदीसारखे किंवा कोड फुटलेल्या व्यक्तीसारखे भासणारे भुताचे झाड हे मेळघाटात ठिकठिकाणी दाट जंगलात आढळून येते. या झाडाला भुत्यासोबतच करू, पांढरुप, कावळी, तांदूळ, सरडोल, कढई अशा विविध नावाने ओळखले जाते. मेळघाटातील आदिवासी बांधव या झाडाला भुत्या किंवा कढई असेच नेहमी संबोधत असल्याची माहिती वृक्ष अभ्यासक जितेंद्र राठी आणि अनिल चौधरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. भुताचे झाड डोंगराळ भागात आढळून येतात. रात्रीच्या अंधारात हे झाड चमकत असल्यामुळे दुरून झाड चमकतानाचे दृश्य अतिशय भयावह असे भासणारे आहे. अक्राळ विक्राळ स्वरूपाचे हे झाड चमकताना पाहून अनेकांना भूत वगैरे काही असावे, असा भास होतो. त्यामुळे ह्या झाडाला 'भुत्या' असे नाव पडले असल्याचे जितेंद्र राठी यांनी सांगितले.
उन्हाळ्यात भुत्या पक्षांचा मित्र :मेळघाटात उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच सर्वच झाडांची पानगळ होते. भुत्याची पाने देखील गळून जातात. त्यामुळे उन्हाळ्यात चांदीसारखे चमकणारे, कधी पांढरे, तर कधी लाल असे कोड फुटलेल्या मनुष्याच्या त्वचेप्रमाणे भासणार्या ह्या झाडावर उन्हाळ्यात लाल रंगाची फुले येतात. या फुलांना स्पर्श केला तर त्यावर असणाऱ्या अगदी सूक्ष्म आकारातील काट्यांमुळे मनुष्याची त्वचा प्रचंड खाजवायला लागते. मात्र, ही झूमकेदार फुले काही दिवसांनी लाल रंग सोडून हिरव्या रंगाची झाल्यावर उन्हाच्या तडाख्याने त्या फुलांमधील बिया बाहेर पडतात. या बिया देखील चमकदार असतात. जंगलातील पक्षांना भूक भागविण्यासाठी या बिया अतिशय उपयुक्त ठरतात. यामुळेच पक्षांसाठी उन्हाळ्यात मित्र ठरणाऱ्या या झाडाच्या फुलांमधील बिया खाण्यासाठी पक्षी पहाटेच्या सुमारास तसेच सायंकाळी या झाडांवर मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याची माहिती देखील जितेंद्र राठी यांनी दिली.