अमरावतीKanhaiya Kumar on Shinde Govt :अखिल भारतीयकाँग्रेस कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार हे अमरावती शहरालगत असणाऱ्या नया अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेले नया अकोला येथील रहिवासी पिरकाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अस्थींना नया अकोला या गावात आणले होते. या अस्थी गावात एका कलशामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. (Kanhaiya Kumar Naya Akola Meeting) अमरावतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या नया अकोला येथील अस्थिकलशाचे दर्शन घेऊन खास अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आयोजित या अभिवादन सोहळ्याला कन्हैया कुमार यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, विचारवंत कैलास कमोद प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदारकीसाठी दलित असल्याचे खोटे प्रमाणपत्र :पूर्वी आपली जात लपविली जायची. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आता तर ज्यांना खासदार व्हायचे आहे असे लोक चक्क दलित असल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खटाटोप करतात आणि निवडून देखील येतात, असे कन्हैया कुमार यांनी सभेला संबोधित करताना म्हणताच सभेतून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आज 450 रुपये सिलिंडर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर जाऊन सर्व महिलांनी बसावे. विशेष म्हणजे, यावेळी हनुमान चालीसा देखील सोबत घेऊन जावा असा टोला देखील कन्हैया कुमार यांनी लगावला.
मतांचा अधिकार हा गिफ्ट नव्हे :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे देशातील सर्वसामान्य व्यक्तीला बहाल केले आहे. इथे विदर्भात देखील विदर्भाची जमीन ही विदर्भातील लोकांची नसून निजामांची होती. भारतीय संविधानाने मात्र सर्व भारतीयांना संवैधानिक अधिकार दिला आणि संविधान निर्मितीतूनच हा भारत देश निर्माण झाला. आज आपल्याला मतांचा जो काही अधिकार मिळाला आहे तो गिफ्ट नव्हे तर अनेकांनी दिलेल्या आहुतीनंतर आपल्याला घटनेच्या माध्यमातून वरदान स्वरूपात मिळाला असल्याचं कन्हैया कुमार म्हणाले.