अमरावती Kal Lavi Conservation Project : लाल, पिवळ्या रंगाचं आणि एखाद्या बाहुलीच्या हातागत आकाराचं 'कळलावी' हे फूल घरात नेलं तर महिलांमध्ये भांडणं लागतात, असा अपप्रचार करण्यात येतो. मात्र महिलांना प्रसूतीदरम्यान कळा येण्यासाठी अतिशय उपयुक्त ही कळलावी औषधी ( Ayurvedic Medicine ) माणसांच्या अनेक आजारांवर अतिशय महत्त्वाचं औषध आहे. ही वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर असताना यावर्षी अमरावती शहरालगतच्या जंगलासह मेळघाटात मोठ्या प्रमाणात बहरली आहे. संकटग्रस्त यादीत समाविष्ट असणाऱ्या या 'कळलावी' वनस्पतीच्या संवर्धनासाठी वनस्पती शास्त्र अभ्यासक सरसावले आहेत. जिल्हाभरात जिथं सध्या कळलावी आढळून येत आहे, त्या सर्व भागात त्याच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवला जात आहे.
असा आहे कळलावी संवर्धन प्रकल्प :ग्लोरिओसा सुपरबा असं कळलावीचं सायंटिफिक नाव असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञ आणि अमरावतीच्या नरसम्मा महाविद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख डॉक्टर सचिन तिप्पट यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. गत पंधरा वर्षांपासून अमरावती शहरालगतच्या जंगलात 'कळलावी' आढळून आली नव्हती. यावर्षी मात्र छत्री तलाव भानखेडा परिसरातील जंगलात 'कळलावी' जिकडंतिकडं बहरली आहे. मेळघाटाच्या हिरव्यागार जंगलात लाल पिवळ्या रंगाची 'कळलावी' उठून दिसत आहे. हे वृक्ष रेड लिस्टेड अर्थात संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत आहे. यावर्षी जिल्ह्यात जिथं मोठ्या प्रमाणात 'कळलावी' दिसत आहे, त्यावर 'कळलावी'चा अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसह आम्ही खास प्रकल्प राबवत असल्याची माहिती सचिन तिप्पट यांनी दिली. या प्रकल्पांतर्गत 'कळलावी' झाडाची घनता किती आहे, याची आम्ही मोजणी करत आहोत. या वृक्षाला कुठल्या भागात वाढण्यास पोषक वातावरण आहे, याची माहिती देखील घेत आहोत. या वृक्षाची अमरावती शहरालगतच्या जंगलात किती मुबलकता आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी 'कळलावी' किती मुबलक प्रमाणात आहे, याचा अभ्यास देखील आम्ही या प्रकल्पांतर्गत करत आहोत, असं प्रा डॉ सचिन तिप्पट म्हणाले. आता गणेशोत्सव काळात सुंदर अशी लाल लालपिवळी फुलं तोडून नेतात, मात्र असं होऊ नये, यासंदर्भातदेखील जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं प्रा. डॉ सचिन तिप्पट म्हणाले.
अशी आहेत 'कळलावी'चं वैशिष्ट्य :डोंगराच्या पायथ्याशी, माळरानावर, मुरमाड जमिनीवर आढळणारी 'कळलावी' ही झुळूकवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीच्या फुलांचा आकार गौरीच्या हाताप्रमाणं दिसत असल्यानं हिला अनेक ठिकाणी 'गौरीचे हात'देखील म्हणतात. फुलांच्या पाकळ्यांची टोकं तांबडी आणि मधला भाग पिवळा असल्यानं काही भागात अग्निज्वाला, तर दुरून समईची ज्योत ठेवल्यासारखी दिसत असल्यानं कुठं हिला 'अग्निशिखा' म्हणून ओळखलं जाते. 'अग्निशिखा' या वनस्पतीला अग्निमुखी, कलहारी, गौरीचे हात, नखस्वामी, बचनाग, अशा अनेक नावांनी ओळखल्या जात असल्याची माहिती संकटग्रस्त वनस्पतीचा अभ्यास करणारे श्रीनाथ वानखडे यांनी "ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.