अमरावती -कोरोना काळात सरकारने विविध क्षेत्रात लावलेले निर्बंध उठले असताना रेल्वेने मात्र ( Railway General Ticket Closed ) अद्यापही कोरोना नियमांचे कारण सांगत रेल्वेचे जनरल तिकीट बंदच ठेवले आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाची धामधूम असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली असताना जनरल तिकीट मिळत नसल्याने तुमच्या रिस्कवर विनातिकिट गाडीत चढा, असा सल्ला रेल्वेचे कर्मचारी देत आहे. मात्र, असे केल्यास गाडीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुप्पट दंड सुद्धा ( Indian Railway Penalty Recovery ) प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन उकळत आहे. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांची लूटमार करणारा असून रेल्वेकडून सुरू असणारा हा अत्याचार त्वरित थांबवावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.
दीड महिन्यात 12 कोटींची वसुली- रेल्वेच्या भुसावळ मंडळाने गत दीड महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या एक लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 43 लाख 83 हजार 434 रुपये वसूल केले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच समोर आणली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आणि लग्नाची गडबड असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी आहे. प्रवासाचे आधीच नियोजन करून 15 दिवसांपूर्वी आरक्षण करणाऱ्यांना नो रूममुळे कन्फर्म रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यात ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना सर्वसाधारण तिकीटही उपलब्ध होत नसल्याने टीसीकडे संपर्क साधून दंडाच्या रकमेसह तिकीट बनवून घ्यावे लागते. यामुळे प्रवास खर्चात या दुप्पट भुर्दंड प्रवाशांना बसतो आहे. सध्या रेल्वेने सर्वसाधारण तिकीट बंद ठेवले असले तरी सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढली आहे. 72 प्रवासी क्षमता असलेल्या या डब्यात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी चढत आहेत. वेटिंग तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे आपल्याकडे वेटिंग तिकीट असल्याचे समजून अनेक जण प्रवास करतात. मात्र, रेल्वे आता अशा प्रवाशांचा परतावा देत असल्याने प्रवासी विनातिकीट ग्राह्य धरून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो आहे.
रेल्वेने केली दुप्पट दंड वसुली -मध्य रेल्वे भुसावळ मंडळात एक एप्रिल ते 15 मे या कालावधीत 45 दिवसात 1 लाख 50 हजार 251 प्रवाशांकडून तब्बल 12 कोटी 46 लाख 83 हजार 434 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गतवर्षी एक एप्रिल ते 15 मे दरम्यान 77 हजार 923 प्रकरणात सहा कोटी 30 लाख 76 हजार 988 रुपये दंड वसूल करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 45 दिवसात दुपटीने दंड वसूल करण्यात आला आहे.