अमरावती- प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती शहरात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लाभार्थ्यांना थाळी वाढून दिली. मात्र, त्यांनी स्वतः शिवभोजनाची चव चाखली नाही.
हेही वाचा -VIDEO : कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताकदिनीच सचिवाला दिला चोप
शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीसह अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथील उपाहारगृह आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय येथे शिवभोजन थाळी योजनेचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शेतकरी उपाहारगृहात शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला. त्यांनी स्वतः शिवभोजनाची थाळी वाढून लाभार्थ्यांना दिली. तसेच, उपाहार गृहाची पाहणी करून त्यांनी उपहारगृहात नियमित स्वच्छता राखून शुद्ध अन्नपदार्थ गरीब व गरजू व्यक्तींना देण्याच्या सूचना भोजनालयाच्या संचालकांना दिल्या. या वेळी, विभागीय आयुक्त सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर संचालक प्रफुल राऊत, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महिला वाणात देतात मातीचे भांडे