अमरावती - अक्षय तृतीयेला स्वयंपाक करताना तेलाचा भडका उडाल्याने घर जळाल्याची घटना वडाळी परिसरातील देवीनगर येथे घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेले नाही. मात्र, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. किसन सरोकार यांच्या घरात ही दुर्घटना घडली आहे.
स्वयंपाक करताना उडाला तेलाचा भडका; आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक - अमरावती
कढईतील उकळत्या तेलात पाण्याचे थेंब उडताच तेलाचा भडका उडाला. या भडक्यामुळे घराच्या छतावरील लाकडांनी पेट घेताच वंदना सरोकार या घराबाहेर धावत आल्या. परिसरातील तरुणांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी घरातील गॅस सिलिंडरही तत्काळ बाहेर काढले.
देवी नगर परिसरातील गोविंद गुलाने यांच्या घरातील एका खोलीत किसन सरोकार भाड्याने राहतात. किसन हे मजुरीचे काम करतात, तर त्यांची पत्नी वंदना सरोकार धुणी-भांडी करतात. त्यांना १५ वर्षाचा मुलगा देखील आहे. मंगळवारी अक्षय तृतीयेनिमित्त त्या गॅस शेगडीवर कढईत भजी तळत होत्या. त्यावेळी कढईतील उकळत्या तेलात पाण्याचे थेंब उडताच तेलाचा भडका उडाला. या भडक्यामुळे घराच्या छतावरील लाकडांनी पेट घेताच वंदना सरोकार या घराबाहेर धावत आल्या. परिसरातील तरुणांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी घरातील गॅस सिलिंडरही तत्काळ बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र, भर उन्हात घडलेल्या या घटनेमुळे पाहता पाहता घराच्या संपूर्ण छप्पराने पेट घेतला. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यांची राख रांगोळी झाली. यामध्ये जवळपास ५० ते ६० हजारांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.