अमरावती -विभागात डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेती पीक, बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील 68 हजार 994 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे 68 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मदत लवकरच वितरीत करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील गारपीटग्रस्त आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र तथा कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतीच त्यांची यासंदर्भात मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्याप्रसंगी बच्चू कडू यांनी विभागाला प्राप्त झालेल्या मदत निधी संदर्भात माहिती दिली.
बच्चू कडूंच्या प्रयत्नाला यश; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत - hailstorm affected farmer news
अमरावती जिल्ह्यातील गारपीटग्रस्त आणि अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र तथा कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नुकतीच त्यांची यासंदर्भात मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्याप्रसंगी बच्चू कडू यांनी विभागाला प्राप्त झालेल्या मदत निधी संदर्भात माहिती दिली.
बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरणासाठी 26 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तामार्फत अमरावती, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांना 67 कोटी 78 लाख रुपयाचा निधी वाटप होईल. प्रचलित नियमानुसार शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानीकरिता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येणार आहे. कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार पात्र शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी करतील. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या मदतीच्या रक्कमेमधून बँकेना कोणत्याही प्रकारची वसुली करण्यास प्रतिबंध घातले आहे. यासाठी सहकार विभागाने आदेश निर्गमित करण्याची सूचना देण्यात आली आहे.
मदत निधी खर्च करताना शासनाच्या सुचना आणि निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच सदर निधी विवक्षित प्रयोजनासाठीच खर्च करण्यात यावा, लाभार्थ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रक्कम आंहरित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तातंरित करावी, सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येईल. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, तसेच राज्य शासनाच्या निधी मधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्यात येणार आहे. याची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर आहे.