अमरावती- जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी आणि बुधवारी सकाळी गारपिटीसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सायंकाळी आपल्या मतदारसंघातील चांदूर बाजार तालुक्यात शेतकऱ्यांना भेट दिली आहे. यावेळी कडू यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे कांदा, केळी, गहू, संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसासह गारपिटीचा जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १८ हजार ९२० हेक्टरमधील रब्बी पिकांसह फळपिकांनाही फटका बसला आहे. यात १० हजार ८३५ हेक्टरमधील कपाशीसह गहू व हरभरा, तसेच ८ हजार ३४ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास देखील हिरावून गेला आहे.