अमरावती -पाऊस वेळेवर व्हावा, यासाठी अनेक गावांमध्ये धोंडी हा प्रकार प्रचलित आहे. मेळघाटातही हा प्रकार प्रचलित आहे. मात्र, यासोबतच मेळघाटात एक अनोक प्रथा आहे. समाधानकारक पाऊस व्हावा, यासाठी मेळघाटात हनुमानाच्या मूर्तीवर पाणी ओतले जाते.
पाऊस यावा, म्हणून मेळघाटातील अनोखी परंपरा मेळाघाटातही अजूनही पाऊस नाहीच...
यंदा राज्यात मान्सून वेळेवर दाखल झाला. विदर्भातही पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यामुळे लगबगीने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, नंतर पावसाने दडी मारली. जवळपास 15 दिवसांपासून अमरावती व मेळघाटमध्येही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी केलेली पिके धोक्यात आहे. तर अनेक भागात दुबार पेरणीचे संकट आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या मेळघाटमध्येही जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.
मेळघाटातील अनोखी परंपरा -
पाऊस येण्यासाठी अनेक ठिकाणी धोंडी काढल्या जाते, अशीच एक परंपरा आजही मेळघाटात आहे. हनुमानाच्या मूर्तीवर पाणी टाकले तर पाऊस नक्कीच आपले दर्शन देईल, असा येथील ग्रामस्थांचा विश्वास आहे. यामुळे वर्षानुवर्षे येथे ही अनोखी प्रथा दिसून येते. गावातील नागरिक एकत्र येतात आणि हनुमानाच्या मूर्तीवर पाणी टाकून अंघोळ घातली जाते. यानंतर ते पाणी नदीत नेण्याचे काम एकत्र करतात. येथील स्थानिकांचा विश्वास आहे की, असे केल्यावरच पाऊस पडण्याची खात्री असते. मेळघाटातील नरवाटी या गावात ही परंपरा दिसून येते. त्यानंतर गावात भंडारा आयोजित केला जातो. सर्व नागरिकांना प्रसादही वाटला जातो. मेळघाटातील विविध प्रकारची परंपरा आणि श्रद्धा वेगवेगळ्या पद्धतींनी जिवंत दिसून येते. यावर्षीही नागरिकांनी पावसाने दडी मारल्यामुळे नरवाटी या गावातील नागरिकांनी गडगा नदीतून पाणी आणून ते हनुमानाच्या मूर्तीवर टाकले.
हेही वाचा -अमरावतीत ऐन पेरणीच्या काळात विजेच्या धक्क्याने 19 जनावरांचा मृत्यू