अमरावती - गुढीपाडव्याचा सण काल सर्व राज्यभरात साजरा झाला. अमरावती जिल्ह्यातील पोहरा - चिरोडी मार्गावरील सावंगा विठोबा येथेही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज देवस्थानाच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले. या देवस्थानात मूर्तीपूजा न करता प्रांगणातील ७३ फुटी उंचीच्या दोन खांबांना ध्वजाचे कापड चढविण्यात येते. कापड चढविण्याचा हा चित्तथरारक क्षण सर्व भाविकांनी अनुभवला.
सावंगा - विठोबा येथील श्रीकृष्ण अबधुत महाराजांच्या मंदिरात मूर्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, याठिकाणी कोणत्याही देवाची मूर्ती नाही. तटबंदी वाड्याच्या स्वरूपातील मंदिरात ७३ फूट उंचीची दोन झेंडे उभारण्यात आले आहे. अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे हे प्रतिक असल्याचे मानण्यात येते. या झेंड्याला पाय न लागू देता एकाचवेळी जुने कापड काढणे आणि नवीन चढविण्याची प्रथा येथे सातशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.