अमरावती- शहरात एका नवरदेवाने २५-३० ऑटोरिक्षाने आपली वरात काढून लग्नमंडपात प्रवेश केला. दिवसभर पैसे कमवण्यासाठी भटकंती करणाऱ्या ऑटोवाल्यांना दोन पैसे मिळतील याच उद्देशाने त्याने ही वरात काढली. त्यामुळे या अमरावतीत या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नवरदेवाचा 30 रिक्षांच्या ताफ्यासह लग्नमंडपात प्रवेश संतोष किरणाके हे अमरावतीमधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. संतोष स्वतः एक ऑटो चालक आहे. तसेच तो एका ऑटो-रिक्षा युनियनचा अध्यक्ष सुद्धा आहे. त्यामुळे ऑटो-रिक्षा चालकांच्या काय समस्या आहेत? याची त्याला पुरेपुर जाणीव आहे. त्यामुळे आपल्या लग्नामध्ये ऑटो-रिक्षानेच वरात नेण्याचे त्याने ठरवले. त्यामधून एक दिवसापुरता का होईन ऑटो-रिक्षा चालकांना फायदा होणार होता. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला.
संतोषचा विवाह शहरातीलच कांचन धुर्वे या मुलीशी ठरला. प्रत्येक नवरदेव अगदी थाटामाटात लग्नमंडपात प्रवेश करतो. मात्र, संतोषने कुठलाही बडेजावपणा न दाखवता २५-३० ऑटो रिक्षाने वरात नेली. एवढे ऑटो एकावेळी रस्त्यावरून जाणार होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार होता. त्यासाठी त्याने रितसर पोलिसांची परवानही घेतली. तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ऑटो-रिक्षाने लग्नमंडपात प्रवेश केला.
नवरदेव सजवलेल्या ऑटोत बसला होता. तर सनई-चौघडा वरातीपुढे वाजत होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्याच्या ताफ्यालाही लाजवेल, अशी त्याची वरात दिसत होती. आपला होणारा नवरा ऑटोने वरात घेऊन येईल याची थोडीशीही कल्पना कांचनला नव्हती. मात्र, ऑटोने आलेली वरात बघून ती भारावून गेली.