अमरावती:विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बेरार अर्थात वऱ्हाड प्रांतात एक महाविद्यालय असावे अशी मागणी त्या काळात पुढे आली. 1912 मध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि विदर्भातील नेते रावबहादूर रघुनाथ मुधोळकर यांनी विदर्भात उच्च शिक्षण देणारी एखादी संस्था असावी असा विचार मांडला. या कामात त्यांना मोरोपंत जोशी यांची साथ लाभली. 1910 मध्ये कायदेमंडळात रावबहादूर मुधोळकर यांनी अमरावतीत वाढत्या लोकसंख्येचा विचार करता महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी सरकार दरबारी केली. मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतातील युवक त्या काळात उच्च शिक्षणासाठी वाराणस, मुंबई, लाहोर इत्यादी ठिकाणी जात असत. 1912 मध्ये नागपूरच्या मॉरीस कॉलेजकडे अमरावतीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. दरम्यान पहिल्या महायुद्धाच्या काळात बेरार प्रांताचे राज्यपाल फ्रांकलीन फ्लाय यांनी प्रस्तावित महाविद्यालयासाठी सार्वजनिक निधी उभारण्याचे आव्हान केले आणि किमान दोन लाख निधी उभा करण्याच्या अटीवर महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला; मात्र हा निधी पुरेसा नसल्यामुळे 1916 मध्ये रावबहादूर मुधोळकर यांनी या मागणी संदर्भात शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे असा ठराव मांडला मात्र तो मंजूर होऊ शकला नाही.
अंतिम प्रस्ताव संमत: याच दरम्यान वऱ्हाड प्रांतात नवीन विद्यापीठ स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बेंजामिन रॉबर्ट सन यांनी अमरावती येथे महाविद्यालय सुरू करण्याची शिफारस केली आणि महाविद्यालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला सीपी अँड बेरार विद्यापीठ समितीने जबलपूर आणि अमरावती येथे एक महाविद्यालय व नागपूर येथे एक विद्यापीठ निर्मितीचा प्रस्ताव मांडला. अखेर नागपूरला 1000 आणि अमरावतीला 300 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय व नागपूर येथे विद्यापीठ असा अंतिम प्रस्ताव संमत झाला.
यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाची स्थापना:22 जानेवारी 1901 ते 6 मे 1910 या काळात इंग्लंडमध्ये किंग एडवर्ड सातवे हे ब्रिटिश साम्राज्याचे राजे होते. सहा मे 1910 ला त्यांची निधन झाले त्यावेळी भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्याने ते त्यावेळी भारताचे ही राजे होते म्हणून अमरावती प्रस्तावित महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. किंग एडवर्ड सातवे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 13 सप्टेंबर 1910 रोजी अमरावती येथील नागरिकांनी सभा आयोजित केली त्यावेळी राजाच्या स्मरणार्थ टाऊन हॉल किंवा पुतळा उभारण्याऐवजी शिक्षण संस्था स्थापण्याचा प्रस्ताव रावबहादुर मुधोळकर आणि मोरोपंत जोशी यांनी शासनाकडे मांडला. सरकारच्या म्हणण्यानुसार त्यावेळी एक लाख 29 हजार 913 रुपये लोक वर्गणीतून जमा करण्यात आले. 23 नोव्हेंबर 1918 रोजी तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड चे मुख्य आयुक्त सर बेंजामिन रॉबर्टसन यांच्या हस्ते किंग एडवर्ड कॉलेजच्या इमारतीची कोणसीला बसवून भूमिपूजन करण्यात आले. अमरावतीच्या या महाविद्यालयाला किंग एडवर्ड यांचे नाव द्यावे ह्या अटीवर ब्रिटिश सरकारने सहकार्याची भूमिका घेतली आणि 13 लाख रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी मॅकलेन यांच्याकडे जबाबदारी सोपविधी त्यांनी शहरालगत 183 एकर जमीन निश्चित केली. त्यापैकी 51 एकर जमीन हे सरकारी पडीक जमीन होती तर उर्वरित जमीन ही शेतजमीन होती. त्या काळात शंभर रुपये प्रति एकर असा मोबदला शेतकऱ्यांना देऊन महाविद्यालयासाठी जमीन विकत घेण्यात आली. यासाठी 15 लाख खर्च आला होता.