अमरावती- सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी जनजागृती केली जात आहे. त्यानुसार झाडे देखील लावली जातात. मात्र, त्यानंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. मात्र, अमरावतीतील ९ वर्षीय चिमुकली त्याला अपवाद ठरली आहे. दरवर्षी ती तिच्या वाढदिवसाला शहरात विविध ठिकाणी झाडे लावते. एवढेच नाहीतर त्या झाडांवर लक्ष सुद्धा ठेवते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
क्षमता संतोष ठाकूर, असे या चिमुकलीचे नाव आहे. शहरातील होली क्लास या शाळेत चौथ्या वर्गात शिकते. क्षमताच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच आहे. मात्र, तिचे बाबा संतोष ठाकूर सामाजिक कार्यात नेहमी समोर असतात. त्यामुळे त्यांनी स्वतः क्षमताच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावले होते. त्यानंतर दुसऱ्या वाढदिवसाला दोन झाडे लावली. असे प्रत्येक वाढदिवसाला झाडांचा संख्या वाढवत गेले. आता क्षमता मोठी झाली. त्यामुळे ती स्वतः झाडांची काळजी घेते. दररोज शाळेत जाताना ती झाडाला पाणी टाकायला विसरत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, योगगुरू रामदेव बाबा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ आदींनी तिच्या या कार्याचे कौतुक केले आहे.