अमरावती :लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या 'संत श्री गजानन महाराज' यांच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे. रेल्वे स्थानक परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिनानिमित्त सर्वाधिक गर्दी उसळली असून; या ठिकाणी महाप्रसादानिमित्य खापर्डे बगीचाच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. मंदिर असणाऱ्या शहरातील सर्वच परिसरात अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
गजानन महाराज प्रकटदिन इतिहास : माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो आहे. यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात प्रचंड उत्साहात साजरा केल्या जात आहे.
ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन : अमरावती शहरातील सर्वच श्री संत गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यासह श्री संत गजानन महाराजांच्या अनेक भक्तांच्या घरी देखील महाप्रसादाचा लाभ भाविक घेत आहेत. अमरावती शहरातील प्रभात कॉलनी, स्वस्तिक नगर, न्यू गणेश कॉलनी, गांधी चौक, रुक्मिणी नगर, रेवसा, वडाळी या भागातील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून; या ठिकाणी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जात आहे.