अमरावती -फुलांच्या शेतीच्या माध्यमातून दोन पैसे अधिक येतील या आशेवर असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी शिरल्याने शेतात भरलेले झेंडूचे फूल हातचे गेले आहे. ज्या भागात झेंडूचे काहीसे उत्पन्न झाले त्या भागातून शेतकऱ्यांनी थेट बाजारात विक्रीसाठी आणलेल्या फुलांचे भाव कमी असल्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.
झेंडूची झाडे शेतातच कोमेजली -
वरूड, मोर्शी , चांदूरबाजार या परिसरात अनेक भागात फुल शेती करणाऱ्यांना बऱ्यापैकी फुले हाती लागली असली, तरी जिल्ह्यातील इतर भागात मात्र अतिवृष्टीमुळे फुल शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अमरावती, भातकुली, चांदुर रेल्वे या तालुक्यातील शेतांमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरल्यामुळे झेंडूची झाडे कोमेजली असल्यामुळे दीड, दोन महिन्यापूर्वी झेंडूच्या फुलांनी पिवळेशार दिसणाऱ्या शेतातील झेंडूच्या झाडावरची फुले आता काळी पडलेली दिसत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका -
फुलशेतीच्या माध्यमातून दसऱ्याच्या पर्वावर झेंडू आणि दिवाळीपर्यंत अस्टर या फुलांचे उत्पन्न घेऊन साठ-सत्तर हजार रुपये कमावता येईल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने झेंडूची झाडे खराब झाली आहेत. येत्या काळात अनेक सण आहेत, त्यामुळे सणांच्या मुहूर्तावर शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
फुल विक्रेत्यांमध्ये स्पर्धा -
दसऱ्याच्या पर्वावर जिल्ह्यातील विविध भागातून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील झेंडूची फुले थेट अमरावती शहरातील विविध चौकात विकासासाठी आणली आहे. यामुळे वर्षभर फुलांच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुल विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला आहेस. बाजारात फूल विक्री करणारे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. फुल विक्रेते 80 ते 100 रुपये किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री करत असताना शेतकरी मात्र 50 ते 60 रुपये किलोनेच फुल विकत आहेत. यामुळे काही ठिकाणी फुल विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसत आहे.
हेही वाचा -खासदार नवनीत राणांकडून सातत्याने कोरोना नियमांचे उल्लंघन; दुर्गोत्सवात केले ढोलवादन